पालखी महामार्गावर कारला मागून धडक बसून दुचाकीस्वार पतीचा मृत्यू ; पत्नी जखमी

पालखी महामार्गावर कारला मागून धडक बसून दुचाकीस्वार पतीचा मृत्यू ; पत्नी जखमी 
Share

वाल्हे – दुचाकीने पुढे निघालेल्या कारला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेली पत्नी जखमी झाली. गाडीवर बसलेल्या दोन लहान मुली सुखरूप आहेत. हा अपघात पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील पातरमळा येथील हॉटेल समर्थ कृपाजवळ सोमवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास घडला.

दादासाहेब धोंडिबा सरगर (वय ४२, रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरगर हे पत्नी आणि दोन मुलींसह दुचाकीवरून जेजुरीहून नीरेकडे जात होते. पातरमळा येथे सकाळी अकराच्या सुमारास एक चारचाकी वाहन पालखी महामार्गावर येत असताना दुचाकीची त्याला पाठीमागील बाजूने जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले.

अपघाताच्या जोरदार आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वार सरगर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच सरगर (रा. सातारा) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Vedh News