विप्रोच्या महिला आय टी इंजिनिअरची हत्या, इन्फोसिसमधील प्रियकर अटकेत ;हिंजवडी आय टी पार्क हादरले!

विप्रोच्या महिला आय टी इंजिनिअरची हत्या, इन्फोसिसमधील प्रियकर अटकेत ;हिंजवडी आय टी पार्क हादरले!
Share

पुणे – गजबजलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विप्रो कंपनीमधील एका तरुण महिला संगणक अभियंत्याची हत्या झाली असून या प्रकरणी इन्फोसिसमधील तिच्या प्रियकाराला अटक करण्यात आली आहे. 

कोमल राजेंद्र डहाके (वय 27, मूळ रा. वर्धा, सध्या रा. साखरे पीजी, हिंजवडी) असे मृत तरुणीचे नाव असून ती विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला होती. शुभम ज्ञानेश्वर काळबांडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज सोमवारी (दि. २३) पहाटे कोमल यांच्या पीजीमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या मारहाणीत कोमल यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

शुभमचे अन्य तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. संशयातून रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर शुभमने कोमलच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी स्वतः आरोपीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी शुभम काळबांडे याला ताब्यात घेऊन त्यानंतर अटक केली.

मृत कोमल डहाळे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. कोमल नोकरीनिमित्त सध्या हिंजवडी येथील साखरे पीजी मध्ये वास्तव्यास होती. आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे हादेखील सॉफ्टवेअर इंजिनिअर असून कोमल आणि शुभम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Vedh News