‘अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास…..’, आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक इशारा

पुणे – पुणे महापालिकेने अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापना कायमस्वरूपी सील करण्यात येतील, असा कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात धडक अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे. एफसी रोड, जेएम रोड, शिवाजीनगर, पेठ भाग तसेच शनिवारवाडा व दगडूशेठ गणपती परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अनधिकृत स्टॉल्स, हातगाड्या व बांधकामे हटवण्यात आली.
लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक ते लिंबराज महाराज चौक दरम्यान पदपथावरील अतिक्रमणे व फलक हटवण्यात आले, मात्र व्यापाऱ्यांचा विरोध आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवण्यात आली.
एफसी रोड, डेक्कन आणि लक्ष्मी रोडनंतर कारवाईचा मोर्चा औंध-बाणेर-बालेवाडी परिसराकडे वळला. बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. सिंहगड रस्ता, खराडी, वाघोली आणि बिबवेवाडीसह विविध भागांत सुमारे २.१३ लाख चौ. फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
मात्र सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे कारवाईनंतर अवघ्या दोन तासांत हॉटेल पुन्हा सुरू झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आयुक्तांनी अधिक कठोर भूमिका घेतली.
कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापना कायमस्वरूपी सील करण्यात येतील, तसेच संबंधित दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. सील केलेली आस्थापना पुन्हा सुरू करायची असल्यास थेट महापालिका आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.







