फेसबुक पोस्टवरून पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना मारहाण

फेसबुक पोस्टवरून पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना मारहाण
Share

पुणे – मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना मराठा आंदोलक आरती मारणे यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबुकवरील एका पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फेसबुकवरील एका पोस्टवरून या वादाची ठिणगी पडली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात भूमिका मांडल्यामुळे रेखा कोंडे आणि आरती मारणे यांच्यात आधीपासूनच वाद निर्माण झाला होता. याच वादातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात मारहाणीच्या घटना घडली.

शुक्रवारी (दि. २०) रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमानंतर बाहेर पडताना दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पुण्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रेखा कोंडे यांच्या तक्रारीवरून आरती मारणे, त्यांची आई, मुलगी आणि पूनम दाभेकर अशा चार महिलांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत आरती मारणे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. ‘रेखा कोंडे यांनी केवळ जरांगे यांच्याविषयीच नव्हे, तर आपल्याबाबतही वैयक्तिक वक्तव्ये केल्याचा’, आरोप त्यांनी केला. ‘पैसे घ्यायचे आणि आमच्यावर आरोप करायचे,’ असा आरोपही मारणे यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद केवळ सोशल मीडियावरील पोस्टपुरता मर्यादित नसून त्यामागे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचाही संदर्भ असल्याचे समोर येत आहे.

Vedh News