पुणे विमानतळ -प्रवाशांची वाट पाहात वाहन घेऊन टर्मिनलवर थांबताय? इकडे लक्ष द्या

पुणे- पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये वाहनचालकांना प्रवाशांची वाट पहात थांबणे आता महागात पडणार आहे. कारण येत्या डिसेंबरपासून विमानतळ प्रशासनाकडून ‘ड्वेल टाइम’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास संबंधित वाहनचालकाला ५०० रुपयांचा दंड होईल. यासाठी टर्मिनलमध्ये एनपीआर (नंबरप्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविले असून दोन मोठे स्क्रीनही लावले जात आहेत. १५ मिनिटांच्या आत वाहन काढले तर कोणतीही कारवाई होणार नाही, मात्र १५ मिनिटांनंतर त्या वाहनाला ५०० रुपयांचा दंड होईल.
पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये दररोज सुमारे १५ हजार वाहनांची वाहतूक होते. अनेक वाहनचालक प्रवाशांची वाट पाहत टर्मिनलच्या परिसरात तासनतास थांबून राहतात. विशेषतः रात्रीच्या वेळी विमानांची वाहतूक जास्त असते, अशावेळी कोंडी होते. प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासन ‘ड्वेल टाइम’ पद्धतीचा नियम लागू करणार आहे.
अशी होणार दंडाची वसुली
वाहनाचा टर्मिनलच्या गेटमधून प्रवेश करताना व गेटमधून बाहेर पडताना सॉफ्टवेअर प्रणालीत नोंद होणार.
१५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाहन थांबल्यास गेटमधून बाहेर पडताना वाहनावरील फास्टटॅगच्या माध्यमातून ५०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली जाणार.
यासाठी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य केला आहे.
फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांकडून रोख रक्कम अथवा ऑनलाइन माध्यमातून दंड वसूल केला जाणार.
दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ‘ड्वेल टाइम’ला मंजुरी मिळाली असून त्याबाबतचा लेखी आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार डिसेंबरपासून टर्मिनल परिसरात १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होईल.







