‘हॉस्पिटल सुरु करण्यासाठी माहेरून २५ लाख घेऊन ये’ डॉक्टर पत्नीचा छळ, तिघांविरोधात गुन्हा

शिरूर – हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करत डॉक्टर पत्नीचा छळ केल्याची घटना शिरूर येथे समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. श्रीकांत बबन वेताळ, नंदा बबन वेताळ आणि बबन वेताळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी महिला देखील डॉक्टर असून त्या मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये नोकरीं करत होत्या.
२६ मे २०२६ रोजी मुंबईत असताना पती डॉ. श्रीकांत वेताळ याने फिर्यादी पत्नीकडे शिरूर येथे हॉस्पिटल सुरु करण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र पत्नीने नकार दिला असता, तू पैसे आणले नाहीस तर तुला सोडून देईन, माझे आई वडील तुला घरात राहू देणार नाहीत. अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे.
त्यानंतर देखील पत्नीने मागणी पूर्ण न केल्यामुळे भर पावसात त्यांना मारहाण करत घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची तक्रार केल्यास आमची अजित पवार, सुनेत्रा पवार दत्तामामा भरणे यांची ओळख आहे. आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही. असे सांगून दबाव टाकल्याचा आरोप फिर्यादी पत्नीने केला आहे.
या प्रकरणी डॉक्टर पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







