पत्नीला खलास करण्याचा दोनदा प्रयत्न, एकदा कार ट्रकला धडकवली, नंतर….; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर थरार!

लोणावळा – पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आधी कार ट्रकला मागून धडकवली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या गालावर व दोन्ही हातांवर वार करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर घडली.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक रोड आणि घाटातून येणारा रस्ता पुण्याकडील बाजूस ज्या ठिकाणी एकत्र येतो, त्या परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील ३६ वर्षीय महिला आपल्या ४९ वर्षीय पतीसोबत मुंबईहून पुण्याकडे येत होत्या. प्रवासादरम्यान पतीने अचानक मुद्दाम आपली कार समोरच्या ट्रकला मागून धडकवली.
कार धडकल्यानंतर पतीने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या गालावर आणि दोन्ही हातांवर अनेक वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. पतीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद जखमी पत्नीने पोलिसांकडे दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.







