कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या दहा लिपिकांना कारणे दाखवा नोटीस ; पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्तांची कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) प्रशासन विभागाने कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागेवर गैरहजर राहिलेल्या १० लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भरारी पथकाच्या तपासणीत ही बाब समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून खुलासा समाधानकारक नसल्यास या लिपिकांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून सात दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. उपायुक्त संदीप खोत यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने नोटिसा बजावल्या.
मुख्य लिपिक सुनील शंकर चव्हाण, विशाल बाळासाहेब कांबळे, लिपिक स्वाती विलास गुल्हाने, मनीषा सुरेंद्र इंगवले, प्रगती राकेश कांबळे, राहुल दिलीप सकटे, संकेत विजयकुमार पेटकर, प्रियांका पांडुरंग कोंढाळकर, अनिकेत पवार आणि लखन डफळ यांना नोटीस बजावण्यात आली. स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि शिक्षण विभागातील लिपिकांचा यामध्ये समावेश आहे.
कार्यालयीन वेळेत जागेवरून गायब होण्याबाबत यापूर्वीही परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तपासणी पथकाच्या पाहणीत संबंधित कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जागेवर उपस्थित नसल्याचे आढळले. त्यांच्या या कृत्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) चा सकृतदर्शनी भंग झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांच्या शिफारशीसह ७ दिवसांत लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. खुलासा असमाधानकारक आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही प्रशासन विभागाने दिला आहे.

