सिंहगड रस्त्यावरील खाऊगल्लीत FDA ची कारवाई! निलंगा राईस सेंटरसह सहा आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश

पुणे- अन्न व औषध प्रशासनाने आता पुण्यातील विविध ठिकाणच्या खाऊगल्लीकडे आपला मोर्चा वळवला आहे. सिंहगड रोडवरील माणिकबाग खाऊ गल्लीत धडक तपासणी मोहीम राबवून एफडीए ने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा खाद्य आस्थापनांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मंगळवारी (दि.१७) नोव्हेंबर २०२६ रोजी ‘ईट राईट स्ट्रीट’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
FDA च्या पुणे विभागातील झोन-०७ च्या पथकाने माणिकबाग येथील एकूण नऊ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये सहा आस्थापनांकडे वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. तसेच खाद्यपदार्थ तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या ठिकाणी गंभीर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवल्याने धूळ आणि कीटकांमुळे अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचे आढळले. कामगारांचे अॅप्रन आणि हातमोजे अस्वच्छ होते. काही कामगारांकडे वैद्यकीय तंदुरुस्तीची प्रमाणपत्रेही उपलब्ध नव्हती. अन्न तयार करण्याच्या जागेजवळ उघड्या कचराकुंड्या, सांडपाण्याचा अयोग्य निचरा आणि अस्वच्छ परिसर आढळून आला. तसेच तयार खाद्यपदार्थांमध्ये रंगाचा वापर होत असल्याचेही तपासणीत नमूद करण्यात आले.
गोयल गंगा बिल्डिंगसमोर, माणिकबाग, सिंहगड रोड परिसरातील खालील आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
मे. निलंगा राईस सेंटर
मे. पुणेरी अंडा भुर्जी सेंटर
मे. वृंदावन डाळ खिचडी
मे. अमृत वडेवाले
मे. ओम साई राम टी सेंटर कॉर्नर
मे. नॅचरल फ्रेश ज्यूस सेंटर
वैध परवाना प्राप्त करून अन्न सुरक्षा नियमांनुसार आवश्यक सुधारणा केल्याशिवाय संबंधित आस्थापनांना पुन्हा व्यवसाय सुरू करता येणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई सह आयुक्त एस. आर. करकळे आणि पदनिर्देशित अधिकारी एन. आर. सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एन. एस. मोहिते आणि के. व्ही. बारवकर यांनी केली.







