मेट्रो पादचारी पुलाच्या कामामुळे भिडे पूल उद्यापासून दीड महिना बंद राहणार !

पुणे- डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठांतील भागांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी मुठा नदीवरील भिडे पूल सुमारे दीड महिना बंद ठेवण्यात येणार आहे. हा पादचारी पूल भिडे पुलावर बांधण्यात येत असल्यामुळे अवजड साहित्य पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या गुरुवारपासून (दि. १९) सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यापूर्वीही पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल बंद करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडी वाढल्याने दिवसा हा पूल नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता आणि पुलाचे काम रात्रीच्या वेळी केले जात होते. परिणामी, कामाचा वेग मंदावला होता.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या या पादचारी पुलामुळे या भागातील नागरिकांना तसेच शिक्षणासाठी या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे सोपे होणार आहे. पुलाचे काम सुरू असताना नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.







