पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव ! ६० दुकाने जळून खाक

पुणे- पुण्यात टिंबर मार्केटमध्ये ‘जय वल्लभ शाळे’जवळ आज, बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून या आगीत ५० ते ६० दुकाने जळून खाक झाली. तसेच काही घराचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होऊन घरातील सामान जळून गेले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंटची एक आणि पीएमआरडीएच्या दोन आणि पुणे अग्निशमन दलाच्या गाडयांसहित २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे १० अग्निशमन अधिकारी आणि १५० अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग जवळच्या निवासी भागात पसरू नये म्हणून बाजाराच्या सर्व बाजूंनी ती विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुमारे दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सध्या ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
या आगीत आसपासच्या घरांचे देखील नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच सर्वानी घराबाहेर धाव घेतली. घरातील मौल्यवान सामान जळून गेल्यामुळे नागरिकांनी टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले.







