दुबईमधील सायबर चोरट्याना १२ हजार सिमकार्ड पुरवली ; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

दुबईमधील सायबर चोरट्याना १२ हजार सिमकार्ड पुरवली ; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईतील सायबर गुन्हेगारांना १० ते १२ हजार भारतीय सिमकार्ड पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या मोठ्या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. या सिमकार्डचा वापर करून देशभरात सायबर फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीला तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत सुमंत ऊर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) हा या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. तो दुबईत राहून एका चिनी नागरिकाच्या मदतीने सायबर गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुमंत दसरे याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले होते.

इंटरपोलच्या माध्यमातून त्याला भारतात आणण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यांसाठी लागणारे १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड त्याने भारतातून मिळविल्याचेही तपासात समोर आले. तपासादरम्यान अंबरनाथ येथील मनिष वाधवा आणि कल्याण येथील महेश चौइथरामानी यांनी २५ ते ३० वेळा दुबईच्या फेऱ्या मारून ही सिमकार्ड सुमंत दसरेला पोहोचवली होती.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांना मुंबई परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. या दोघांनी सुमंत दसरे याला दुबईत पुरविलेली सिमकार्ड सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे पश्चिम, मूळ रा. वैशाली, बिहार) यांच्याकडून मिळविल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी सुरज आणि राजा यांनाही अटक केली.

सुरज चिकवा आणि राजा कुमार हे मोबाईल सिमकार्ड विक्री कंपनीमध्ये काम करत होते. ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढल्यानंतर संबंधित ग्राहकांना ओटीपी एक्सपायर झाला, सर्व्हर उपलब्ध नसल्याने सिमकार्ड ॲक्टिव्ह झाले नाही, अशी खोटी कारणे सांगून त्यांना सिमकार्ड दिले जात नव्हते. त्याऐवजी ही सिमकार्ड अन्य आरोपींना पुरवून त्याबदल्यात आर्थिक मोबदला घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुबईत पाठवलेल्या या भारतीय सिमकार्डचा वापर म्युल बँक खाती लिंक करण्यासाठी, बनावट ॲप्स आणि ईमेल आयडी तयार करण्यासाठी केला जात होता. या माध्यमातून देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, सागर पोमण यांच्यासह पोलीस पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Vedh News