लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक २० हजाराची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक २० हजाराची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात 
Share

लोणावळा – गुन्ह्याचे कलम कमी करणे, जामीनासाठी मदत करणे, तपासात सहकार्य करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणे यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

नाथा रामकिशन केकाण (वय ३८) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३३ वर्षीय तक्रारदाराच्या भावाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास केकाण यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी, कलमांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी केकाण यांनी यापूर्वी वेळोवेळी मागणी करून १ लाख ३० हजार रुपये घेतले होते.

१४ नोव्हेंबर रोजी भावावरील चॅप्टर केसच्या कारवाईत मदत करण्यासाठी तसेच आरोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी आणखी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले होते.

या तक्रारीची पडताळणी केली असता केकाण यांनी यापूर्वी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे तसेच आणखी २० हजार मागितल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट परिसरात पंचासमक्ष २० हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस हवालदार वनिता गोरे, पोलीस शिपाई रवी दिवेकर, चालक पोलीस हवालदार दगडू सोनावणे यांनी केली.

Vedh News