दिवाळीच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या १५ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू; उरळी कांचन मधील घटना

उरळी कांचन – दिवाळीनिमित्त मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोरतापवाडी (ता.हवेली) येथे रविवारी (ता.१५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
नागेश गुंडाप्पा पुजारी (वय-१५,मूळ रा.शिवरकर गार्डन,वानवडी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश हा इयत्ता नववीत शिकत होता. सोरतापवाडी येथे त्याची मावशी राहत असून, दिवाळीनिमित्त आणि मावशी आजारी असल्याने तो आई-वडिलांसह दोन दिवसांपूर्वी सोरतापवाडी येथे आला होता. शनिवारी (ता.१४) त्याचे आई-वडील घरी परतले; मात्र नागेश मावशीकडेच थांबला होता.
रविवारी दुपारी नागेशने मावस भावाकडे पोहण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघेही वरचा मळा परिसरातील एका विहिरीवर गेले. नागेशने विहिरीत उडी मारली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. एकदा पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो पुन्हा वर येऊ शकला नाही. विहिरीत पाणी जास्त असल्याने मावस भावालाही त्याला बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्याने तातडीने घरच्यांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रफुल्ल सुतार व संतोष जाधव, कस्तुरी प्रतिष्ठानचे मिलिंद मेमाणे व घनश्याम मेमाणे तसेच रुग्णवाहिका चालक संतोष झोंबाडे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाणी जास्त असल्याने नागेशला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.अखेर वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले.
त्यानंतर नागेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.






