पीएमपी बससमोर आलेली महिला वाचली पण बसमधील महिलेचे पाच दात तुटले..पुण्यातील घटना

पीएमपी बससमोर आलेली महिला वाचली पण बसमधील महिलेचे पाच दात तुटले..पुण्यातील घटना
Share

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात महिला घुसल्यामुळे पीएमपी बस चालकाने अचानक जोरात ब्रेक दाबला. महिलेला वाचवण्याच्या नादात चालकाने मारलेल्या या ब्रेकमुळे एका महिला प्रवाशाचे पाच दात तुटले. 

बसमधील इतर प्रवासी देखील जखमी झाले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती मयूर दिघे (वय ३६, रा. कात्रज) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील बीआरटी मार्गात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील बीआरटी मार्गातून एक महिला निघाली होती. ही महिला अचानक बससमोर आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पीएमपी बस चालकाने जोरात ब्रेक दाबला. बसला अचानक बसलेल्या या जोरदार झटक्यामुळे बसमधील चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली.

या घटनेत तक्रारदार ज्योती दिघे यांना सर्वात गंभीर इजा झाली आहे. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांचा चेहरा समोरील लोखंडी गजावर जोरात आपटला. या धडकेत त्यांचे पाच दात तुटले असून, तुटलेले दात ओठात शिरल्याने त्यांना मोठी दुखापत झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर जखमी ज्योती दिघे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Vedh News