शिरूरमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदावरून नात्यातील दोन कुटुंबात कोयता, रॉडने हाणामारी

शिरूरमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदावरून नात्यातील दोन कुटुंबात कोयता, रॉडने हाणामारी
Share

शिरूर- शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या राजकारणात ग्रामपंचायतीचे सदस्यपद देण्यावरून नात्यातील दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. बुधवारी (ता. १२) मध्यरात्री झालेल्या या वादात एका मोटारीची दगड टाकून व कुऱ्हाडीने तोडफोड करण्यात आली. कोयत्यासह रॉड आणि दांडक्याने झालेल्या हाणामारीत एका महिलेसह तरूण जखमी झाला असून, दोन्ही बाजूच्या ११ जणांविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सीमा सोमनाथ घावटे (वय ४०, रा. पाषाणळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर ग्रामीण चे माजी उपसरपंच सचिन भाऊसाहेब घावटे, प्रथमेश धनंजय घावटे (रा. पाषाणमळा, शिरूर) व ऋषिकेश विजय शेलार (रा. षटकार कॉलनी, शिरूर) यांच्याविरूद्ध तर प्रथमेश धनंजय घावटे (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ सुभाष घावटे, नितीन सुभाष घावटे, विलास गोधाजी घावटे, प्रथमेश सोमनाथ घावटे, सार्थक सोमनाथ घावटे, सीमा सोमनाथ घावटे (सर्व रा. पाषाणमळा, शिरूर) यांच्यासह शंकर शिंदे व आदी पैठणकर (पूर्ण नाव नाही, रा. रामलिंग, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांपूर्वी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती, त्यावेळी सीमा घावटे यांना अडीच वर्षांनी सदस्यपद देण्याबाबत भावकीत निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबतची कार्यवाही न झाल्याने सीमा यांचे चुलत सासरे विलास घावटे यांनी मंगळवारी (ता. १०) रात्री उशिरा सचिन घावटे यांना फोन करून, ‘तुझ्या उपसरपंचपदाला व ग्रामपंचायत सदस्य या पदाला अडीच वर्षे झाली असल्याने तु आता आपल्या सर्वांचे ठरल्याप्रमाणे आमच्या घरातील सीमा घावटे हिला ग्रामपंचायत सदस्यपद देऊन टाक’, असे म्हणाल्याचा राग आल्याने सचिन घावटे, प्रथमेश घावटे व ऋषिकेश शेलार यांनी सोमनाथ घावटे यांच्या घरी जाऊन त्यांना घरातून ओढून नेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सीमा यांना तसेच त्यांचे दीर नितीन यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. प्रथमेश घावटे याने कोयत्याने सीमा यांचा मुलगा बंटी याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता नवनाथ घावटे यांनी त्याचा हात धरला, त्यामुळे दुर्देवी प्रसंग टळला. यानंतर संबंधित त्यांची मोटार तेथेच सोडून पळून गेले.

या घटनेनंतर पाषाणमळा येथे सोमनाथ घावटे यांच्या घरासमोरील मोटारीवर (क्र. एमएच १२ व्हीक्यू ७०७२) दगडफेक करण्यात आली. कुऱ्हाडीने काचा फोडून मोटारीचे नुकसान केले. याप्रकरणी प्रथमेश धनंजय घावटे यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. उपसरपंचपद व ग्रामपंचायत सदस्यपदाचा वाद आपण मिटवून घेऊ, असा निरोप आल्याने मी, सचिन घावटे व ऋषि शेलार हे सोमनाथ घावटे यांच्या घरी गेलो असता सोमनाथ घावटे याने सचिन घावटे यांना लोखंडी रॉडने पाठीवर व मांडीवर मारले. नितीन घावटे याने लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली तर प्रथमेश सोमनाथ घावटे याने मारण्याकरिता आणलेला कोयता मी धरला. सार्थक याने दगडाने मारहाण केली. सीमा घावटे यांनी सचिन यांचा शर्ट फाडून त्यांच्या गळ्यातील दहा तोळ्याची चेन हिसकावून काढून घेतली. वरील सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, प्रथमेश धनंजय घावटे हे तक्रार देण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्यात आले असताना आपण हा वाद मिटवू असे सचिन घावटे यांनी सांगितल्याने ते बंधू निखिल याच्यासह घावटे वस्ती येथे घरी गेले असता त्यांच्या मोटारीला ट्रॅक्टर आडवा लावून सार्थक घावटे, सोमनाथ घावटे, शंकर शिंदे व आदी पैठणकर यांनी त्यांना मारहाण केली. शंकर शिंदे याने उलटा कोयता डोक्यात मारल्याने डोके फुटले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी, भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करून तक्रारी देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंनी फिर्यादी देण्यात आल्या असून, शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Vedh News