देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला अटक

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस बाळगल्या प्रकरणी २६ वर्षीय तरुणाला वडगाव शेरी परिसरातून अटक केली. पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक २ ने ही कारवाई केली.
प्रथमेश ऊर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
खंडणीविरोधी पथक परिमंडळ सातच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना जाधवकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. घराजवळील झुडपात लपवलेल्या पिशवीतून पोलिसांनी पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याचे जाधवने चौकशीत सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि पथकातील खरात, घावटे, कुसाळकर व वाघमारे यांनी ही कारवाई केली.






