अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; काळेवाडी येथील घटना, एकाला अटक

अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; काळेवाडी येथील घटना, एकाला अटक
Share

पिंपरी- एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने मुलाच्या डाव्या हातावर वार केल्याची घटना काळेवाडी येथील पाचपीर चौकाजवळ ऑक्सिगर हॉस्पिटलसमोर घडली. या घटनेनंतर दोघांनी हातातील कोयता हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.

वैभव देवीदास गणगोपाळ (वय १९) आणि गौरव चंद्रकांत साळवे (वय १९) अशी दोन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा पायी जात असताना एका आरोपीने त्याला शिवीगाळ करून डावा हात पकडत मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला दोन्ही हातांनी पकडून ठेवले. याचवेळी दुसरा आरोपी गौरव साळवे याने कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कोयता हवेत फिरवत, धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव गणगोपाळ याला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा सहभाग तपासला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.

Vedh News