समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात, १८ वाहने एकमेकांवर आदळली, सुदैवाने जीवितहानी नाही

समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात, १८ वाहने एकमेकांवर आदळली, सुदैवाने जीवितहानी नाही
Share

सिंदखेड राजा- समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील दुसरबीडजवळ १८ वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्यानंतर एकापाठोपाठ एक वाहने आदळली. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण साखळी अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात इतका भीषण होता की महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांची रांग लागलेली पाहायला मिळाली.

असा झाला अपघात..

शुक्रवारी सकाळी साधारण साडेदहाच्या दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड जवळ एक अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू होते. यावेळी महामार्गावरून जाणारी वाहतूक काही काळ रस्त्यावरच थांबवण्यात आली होती. त्याचवेळी समृद्धीवरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने ही वाहने पुढील वाहनांवर एकापाठोपाठ आदळली आणि अपघात झाला. या अपघातात वाहनात बसलेले १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. बहुतांश जखमींना उपचारासाठी जळगाव/जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते राजेश टोपे हे त्याच महामार्गावरून जात होते, त्यांनी घटनास्थळी थांबून मदतकार्य केले आणि जखमींना उपचारासाठी मदत पोहोचवली. राजेश टोपे यांनी अपघात कसा घडला त्याची माहिती दिली. ते म्हणाले, ” नागपूरला मी लग्न समारंभासाठी गेलो होतो, परतीचा प्रवास करत असताना साधारण साडेदहा अकरा वाजेच्या दरम्यान एक मिक्सरची ट्रॉली पलटी झालेली होती आणि त्या ट्रॉलीमुळे मुंबईकडे जाणारा रोड ब्लॉक झालेला होता, भरपूर गाड्या लाईन मध्ये थांबलेल्या होत्या. मात्र त्याचवेळी पाठीमागून भरावेगात आलेला एक स्टीलचा ट्रक, त्या चालकाला ते ट्रक अजिबात कंट्रोल झालं नाही म्हणून त्याने मागच्या सगळ्या गाड्यांना धडक दिल्या. महत्त्वाचं म्हणजे माझी गाडी ज्या ठिकाणी उभा होती, त्याच्या अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून धडक दिली आणि थांबली”

Vedh News