‘पवना नदीकाठी झालेल्या ‘त्या’ प्रकाराचा जाहीर निषेध’ – छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता

‘पवना नदीकाठी झालेल्या ‘त्या’ प्रकाराचा जाहीर निषेध’ – छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता
Share

पिंपरी- छटपूजेच्या तयारीदरम्यान पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याच्या प्रकारावर पिंपरी-चिंचवड शहर मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यावर हनुमान मित्र मंडळ आणि पिंपरी चिंचवड छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ता यांनी देखील प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र, या एका घटनेवरून संपूर्ण उत्तर भारतीय समाजाला लक्ष्य करणे किंवा छटपूजेच्या उत्सवाबाबत वाद निर्माण करणे योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर मनसेने उत्तर भारतीय बांधवांकडून पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर करण्यात येणाऱ्या छटपूजेच्या तयारीवर आक्षेप घेतला आहे. घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याच्या प्रकारावर मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. संस्कृतीला सोडून घाटांवर पट्टे मारून सातबारा केल्यासारखी नावे लिहिण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. देवपूजेला आमचा विरोध नसून सार्वजनिक घाटांवर अशा पद्धतीने हक्क सांगण्याला विरोध असल्याचेही मनसेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याचा प्रकार प्रसारमाध्यमांद्वारे आमच्या निदर्शनास आला आहे. पिंपरी घाटावर कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून रेषा आखण्याचे कृत्य केले आहे. आम्ही कोणत्याही घाटाचा सातबारा आमच्या नावावर केलेला नाही. उत्तर भारतीय समाजातील बहुतांश नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

अनेकांचे कुटुंब, व्यवसाय, रोजगार आणि मुलांचे शिक्षण याच शहराशी जोडलेले आहे. त्यामुळे या शहराविषयी आमच्या मनात आपुलकी आणि आत्मीयतेची भावना आहे. आम्ही या शहराचे नागरिक आहोत. छटपूजा हा आमच्या समाजाचा महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शहरातील घाटांवरच आम्ही हा उत्सव श्रद्धेने साजरा करीत आहोत. यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही.

शहरातील बहुतांश घाटांची सद्यस्थिती पाहता तेथे स्वच्छता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. अनेक ठिकाणी घाटांवर कचरा, अस्वच्छता आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यंत्रणेवर पूर्णपणे अवलंबून न राहता उत्तर भारतीय समाजबांधव एकत्र येऊन अनेक घाटांची स्वच्छता स्वतःच्या खर्चातून करतात.

छटपूजेच्या पार्श्वभूमीवर घाट स्वच्छ करणे, परिसर व्यवस्थित ठेवणे आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजबांधव पुढाकार घेतात. त्यामुळे घाटांच्या स्वच्छतेसाठी आणि व्यवस्थेसाठी योगदान देणाऱ्या समाजाला केवळ एका खोडसाळ प्रकारावरून दोषी धरणे योग्य ठरणार नाही.

आजवर छटपूजेच्या निमित्ताने शहरात अशा प्रकारचा वाद निर्माण झालेला नाही. दरवर्षी उत्तर भारतीय समाजबांधव अत्यंत शांततेत, श्रद्धेने आणि धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा करतात. यंदाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राहील, याची आम्ही दक्षता घेऊ. घाटांवर रेषा आखणे, नावे लिहिणे किंवा इतरांना गैरसोय होईल असे कृत्य करणे आम्हालाही मान्य नाही. ज्यांनी हा प्रकार केला असेल त्यांनीही सार्वजनिक ठिकाणांचा आदर राखावा, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Vedh News