डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ लाखांची फसवणूक

पुणे- नाशिक येथील एका बँकेची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
कर्वेनगर येथील तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर ६ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. नाशिकमधील एका बँकेत दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असून, त्यातील रक्कम महिलेच्या खात्यात जमा झाल्याची बतावणी चोरट्यांनी केली. याप्रकरणी पोलिसांकडून ‘डिजिटल ॲरेस्ट’ करण्यात येईल आणि मालमत्ता जप्त केली जाईल, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.
अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी धमकावल्यानंतर घाबरलेल्या महिलेने ‘आरटीजीएस’द्वारे ३२ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. अधिक पैशांची मागणी झाल्यावर संशय आल्याने महिलेने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.






