पायल झांबरे प्रकरणात धक्कादायक खुलासा ! झांबरे कुटुंबाच्या घरातून ३५ तोळे दागिने आणि मोबाईल जप्त
पुणे- पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली असून, झांबरे कुटुंबाच्या घरातून तब्बल 35 तोळे दागिने, काही महत्त्वाचे मोबाईल फोन आणि घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. या नव्या पुराव्यांमुळे प्रकरणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जप्त केलेले सर्व पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच ३ मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. गुन्ह्यातील एकूण दागिन्यांपैकी अद्याप १५ तोळे सोने मिळालेले नाही. हे सोने फरार आरोपी नणंद अक्षता झांबरे ऊर्फ निमण हिच्याकडे असल्याचा पोलिसांना संशय आहे. जप्त केलेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील संभाषणे आणि संदेशांची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्ष आणि तक्रारदारांच्या वकिलांनी केली.
काही दिवसांपूर्वी पायल झांबरे हिने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पायलच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी आणि इतर आर्थिक कारणांसाठी अमानुष छळ केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे आणि सासरा अरविंद झांबरे यांना अटक करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणातील आणखी एक मुख्य संशयित असणारी पायलची नणंद अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असून ती फरार आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी ‘भाकरी करपली’ या अत्यंत साध्या घरगुती कारणावरून पायलने हे टोकाचे पाऊल उचलले, असा अजब युक्तिवाद केला. मात्र, पायलच्या माहेरच्यांनी आणि पोलिसांनी हा खोटा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून पायलचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
आता पोलिसांच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज आणि जप्त केलेले मोबाईल फोन या तपासातील सर्वात मोठे आणि निर्णायक दुवे ठरणार आहेत. मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून पायलला नेमका कसा त्रास दिला जात होता, याचा संपूर्ण उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
