हौसिंग सोसायटीत रहिवाशांमध्ये वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खांदा निखळला

हौसिंग सोसायटीत रहिवाशांमध्ये वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खांदा निखळला
Share

पिंपरी – हिंजवडी फेज-१ येथील ब्ल्यू रिज सोसायटीमध्ये पूर्वी केलेल्या तक्रारीच्या कारणावरून दोन रहिवाशांमध्ये वाद होऊन एकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीच्या उजव्या हाताचा खांदा निखळला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर नागाभूषण रेड्डी (वय ४८) यांनी फिर्याद दिली असून, सुशांत मिश्रा (वय ५०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही ब्ल्यू रिज सोसायटीतील रहिवासी असून खासगी नोकरी करतात. शुक्रवारी (दि.६) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अंगावर धावून जात हाताने मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या धक्काबुक्कीत रेड्डी यांच्या उजव्या हाताचा खांदा निखळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, आरोपीने फिर्यादीच्या पत्नी व मुलांना बांधून मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Vedh News