धक्कादायक! कचऱ्यात आढळले पुरुषाचे दोन्ही पाय ; पिंपळे गुरवमधील प्रकार

पिंपरी – पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या अगदी कडेला कचऱ्यात टाकलेल्या एका पोत्यामध्ये पुरुषाचे दोन्ही पाय आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोन तरुण कचरा गोळा करण्यासाठी आले असताना हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे परिसरात कचरा गोळा करण्यासाठी आले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका पोत्यावर त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्यांना संशय आला. सुरुवातीला या पोत्यामध्ये श्वानाचे पाय असावेत, असा त्यांचा समज झाला. मात्र, त्यांनी जेव्हा पोते उघडून पाहिले, तेव्हा त्यामध्ये गुडघ्यापासून वेगळे केलेले दोन मानवी पाय त्यांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार पाहून दोघेही हादरून गेले. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक आयुक्त मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह क्राईम ब्रँच पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मानवी अवयवांची ओळख पटवणे आणि घटनेमागील सत्य शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वर्दळीच्या परिसरात मानवी अवयव आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दोन्ही पाय नेमके कोणत्या व्यक्तीचे आहेत? संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का? शरीराचे इतर अवयव कुठे आहेत? गुडघ्यापासून पाय वेगळे करून ते पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला कचऱ्यात कोणी टाकले? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास करून या घटनेमागील गूढ उकलण्याचे मोठे आव्हान सांगवी पोलिसांसमोर आहे.






