एकीकडे हिंजवडी मेट्रोचे उदघाटन तर दुसरीकडे उदघाटनाच्या विरोधात बाणेर-बालेवाडीकरांचे आंदोलन

पुणे- एकीकडे मंगळवारी (दि. ३) पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले तर त्याचवेळी बाणेरमधील नागरिकांनी हाबाजी सायकर (गणराज) चौक येथे तीव्र आंदोलन करून या उदघाटनाला विरोध केला. बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानक सुरू केल्याशिवाय मेट्रो सेवा सुरू करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एकीकडे महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ऑनलाइन पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उदघाटन करण्यात आले. प्रत्यक्ष उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोच्या लोकर्पण सोहळा आयोजित केला असतानाच त्याच दिवशी मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन केले. या आंदोलनात बाणेर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या नियोजनाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानक सुरू केल्याशिवाय मेट्रो सेवा सुरू करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या वेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी बाणेरमधील नागरिकांनी जागा उपलब्ध करून देण्यासह विविध प्रकारे सहकार्य केले. मात्र, आता मेट्रो सेवा सुरू करताना बाणेर-बालेवाडी परिसरातील स्थानकांचा समावेश नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांपासून मेट्रोच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना धूळ, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना स्थानक सुरू करण्याकडे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
बाणेर-बालेवाडीतील नागरिकांनाही मेट्रो सेवेचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित स्थानकांचे काम पूर्ण करून ती तातडीने प्रवाशांसाठी खुली करावीत, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.






