भाजप युवा मोर्चातर्फे भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात ‘भव्य किल्ले बनवा स्पर्धा’

भाजप युवा मोर्चातर्फे भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात ‘भव्य किल्ले बनवा स्पर्धा’
Share

पिंपरी- छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने ‘भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन भोसरी, चिंचवड आणि पिंपरी अशा तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अमित देशमुख, चिंचवडसाठी दिनेश काटे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी विशाल वाघेरे यांच्याकडे स्पर्धेची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे.

सहभागी स्पर्धकांनी ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीवर आधारित किल्ला तयार करणे आवश्यक आहे. किल्ला बनवताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. किल्ल्याची रचना, ऐतिहासिक माहिती, आकर्षक मांडणी आणि कल्पकता या निकषांवर परीक्षण केले जाणार आहे. किल्ल्याची प्रतिकृती स्पर्धकांनी स्वतः तयार केलेली असावी. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी संबंधित विधानसभा स्पर्धा प्रमुखांकडे करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गड-किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा घराघरांत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यादव‌ यांनी सांगितले.

Vedh News