पीएमपीचा मोठा निर्णय ; ज्येष्ठ नागरिकांना १ नोव्हेंबरपासून बस तिकिटात ५० टक्के सवलत

पीएमपीचा मोठा निर्णय ; ज्येष्ठ नागरिकांना १ नोव्हेंबरपासून बस तिकिटात ५० टक्के सवलत
Share

पुणे- पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे. दैनिक पासनंतर आता तिकीट दरातदेखील ज्येष्ठांना सवलत देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून, यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

‘पीएमपी’ प्रशासनाने यापूर्वीच ज्येष्ठ नागरिकांसाठी ३५ रुपयांचा सवलतीचा दैनिक पास सुरू केला आहे. आता प्रशासनाने दैनंदिन तिकीट दरातही ५० टक्के सवलत लागू केली. त्यामुळे ज्या ज्येष्ठांना केवळ एकाच मार्गावर किंवा कमी अंतराचा प्रवास करायचा आहे, त्यांना संपूर्ण दिवसाचा पास काढण्याऐवजी आता थेट अर्ध्या दरात तिकीट मिळणार आहे. सर्व बस मार्गांवर ही सवलत लागू असणार आहे.

बस प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत मिळण्यासाठी वाहकाकडे वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक असणार आहे. यासाठी प्रवाशांना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ‘पीएमपी’ने दिलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, आधार कार्डवर जन्माची संपूर्ण तारीख (दिवस, महिना, वर्ष) असणे अनिवार्य आहे.

Vedh News