पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद
Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपला कामकाज जनतेपासून लपवायचे आहे का ?असा प्रश्न विचारला जात आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासकामांसह आर्थिक प्रस्ताव, प्रशासकीय निर्णय आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा होते. या चर्चेची माहिती नागरिकांना थेट मिळावी, यासाठी सभेचे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते. मात्र, वारंवार प्रक्षेपण बंद होत असल्याने सभागृहातील कामकाज नागरिकांपासून दूर ठेवले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वीही सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले होते. त्यावेळी या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही काळाने प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना सभागृहातील चर्चा आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिका जाणून घेता येत होत्या.

मात्र, गुरुवारी (दि. २९) सुरू असलेल्या महापालिका सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय नेमका कोणी आणि कोणत्या कारणास्तव घेतला, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

Vedh News