अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून ; इंदापूर तालुक्यात सणसर येथील घटना

इंदापूर – अनैतिक संबंधाच्या संशयातून २९ वर्षीय युवकाचा लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना निमगाव केतकी येथे घडली.
पुष्पराज मुरलीधर गायकवाड असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील भीमराव बारवकर आणि अशुतोष संजय भोंग (दोघेही रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत युवकाची आई सुलोचना मुरलीधर गायकवाड (वय-४७, रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पराज हा बदली वाहनचालक म्हणून काम करीत होता.पुष्पराज याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती त्याने काही दिवसांपूर्वी आईला दिली होती. या संबंधांवरून निमगाव केतकी येथील स्वप्नील बारवकर आणि अशुतोष भोंग यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्याने आईला सांगितले होते. याबाबत आईने पुष्पराजला समजावून सांगितले होते. दरम्यान गुरुवार (ता. २९) रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पुष्पराज याला निमगाव केतकी येथील केतकेश्वर विद्यालयाजवळ मारहाण झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.






