कामावर उशिरा येण्याबद्दल विचारणा केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी फळीने वार

पिंपरी- कामावर उशिरा आल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून कामगाराने सहकाऱ्याच्या डोक्यात लाकडी फळीने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात संबंधित कामगाराच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी नितीन सुरेश कांबळे (वय ३६, रा. क्रांती सूर्यानगर, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. वसंत गोपीचंद शेलार (वय ५०, रा. भगतवस्ती, हनुमाननगर, गणपती मंदिराजवळ, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास टेल्को रस्त्यावरील सेंच्युरी एन्का लिमिटेड कंपनीतील एनटीसी फॅब्रिक गोदामात ही घटना घडली. फिर्यादी यांचे भाऊ तुषार सुरेश कांबळे यांनी आरोपीला कामावर उशिरा का आला, अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाकडी फळीने त्यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात तुषार कांबळे गंभीर जखमी झाले.






