गांजाची तस्करी केल्याप्रकरणी पोलीस अंमलदाराला अटक, तेलंगणा पोलिसांची कारवाई

गांजाची तस्करी केल्याप्रकरणी पोलीस अंमलदाराला अटक, तेलंगणा पोलिसांची कारवाई
Share

पुणे – पुणे शहर पोलीस दलातील एका अंमलदाराला तेलंगणा राज्यात रेल्वेतून १२ किलो गांजाची कथित तस्करी करताना पकडण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन ज्ञानू शिंदे (वय ३३, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तेलंगणातील नेकुंडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शिंदे हा पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, त्याची नेमणूक वाहतूक शाखेच्या विश्रामबाग वाहतूक विभागात होती. ८ ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर होता. याच कालावधीत रेल्वेतून १२ किलो गांजा घेऊन जात असल्याच्या आरोपावरून तेलंगणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

शिंदे हा एवढ्या मोठ्या प्रमाणातील गांजा नेमका कुठे घेऊन जात होता, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस कर्मचारीच अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये अडकल्याने पुणे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

 

Vedh News