‘मिसिंग लिंक’वर १ नोव्हेंबर पासून मालवाहू व जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ मार्गावर १ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व प्रकारच्या मालवाहू व जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी यासंदर्भात २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
मालवाहू वाहनांना बंदी: पिकअप व्हॅन, टाटा एस, मालवाहू ट्रक, तसेच ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना ‘मिसिंग लिंक’वरून जाण्यास सक्त मनाई आहे. अशा वाहनांना जुन्या द्रुतगती मार्गाचाच वापर करावा लागेल. कारसाठी वेगमर्यादा: कार आणि हलक्या खासगी वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. प्रवासी बसेससाठी कमाल वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटर असणार आहे. जड आणि मालवाहू वाहनांसाठी जुना द्रुतगती महामार्ग पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध असेल.
बोगद्यांची रचना आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या वाहनाला या मार्गावर प्रवेशाची परवानगी आहे की नाही, याची खात्री करावी असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.






