पुण्यात बनावट नोटा बनवणारी टोळी जेरबंद ; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

पुण्यात बनावट नोटा बनवणारी टोळी जेरबंद ; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त
Share

पुणे – हुबेहूब भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपये दराच्या पाच लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर आणि संगणकीय साहित्य जप्त केले आहे.

सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखानवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजित रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी सातारा, कोल्हापूर व मुंबई शहरात कारनामे करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरात एकजण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या पथकाने १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईच्या मागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळून आल्या.

सलमानकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या पूर्वपरवानगीने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना शिरोळ येथून अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड, माऊस असा २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, आरोपी शाफाज अन्सारी याच्या घरातून पाचशे रुपयांच्या आणखी ३२३ बनावट नोटा हस्तगत केल्या. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी चौघांकडून पाचशे रुपयांच्या एक हजार १२८ बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले. या बनावट नोटांची छपाई आणि साठा प्रामुख्याने कोल्हापूर (शिरोळ) आणि नालासोपारा येथून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहाय्यक निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलेश सुर्वे, समीर पवार, शशिकांत दरेकर, जाकीर मणियार, नितीन मुंढे, महेश कदम, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Vedh News