पुण्यात १८ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, आरोपीला चोप देऊन दिले पोलिसांच्या ताब्यात

पुणे- मैत्रिणीची वाट बघणाऱ्या १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न तरुणीच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात शनिवारी (दि. २४ ) सायंकाळी समर्थ डेअरीसमोर घडली.
जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने छातीला हात लावून शर्ट ओढत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या आरडाओरडीनंतर मैत्रीण आणि स्थानिक नागरिक मदतीला धावले. घटनास्थळी आलेल्या तिच्या मैत्रिणीने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत तरुणी खाली पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. यावेळी त्याने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिच्या ओळखीचा नव्हता. तिची मैत्रीण वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने आणि नागरिकांनी मदत केल्याने ती बचावली. आरोपीला या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही तिने केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनेशी संबंधित पुढील माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.






