सहा हजारांची लाच घेताना वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात ; शेतात माती टाकण्यासाठी मागितली लाच

बारामती- शेतात माती टाकण्याचे काम विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ६ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेच्या पथकाने माळेगाव (बारामती) येथे सापळा रचून रंगेहात अटक केली आहे.
जहीर सिराज शेख (वय ४७, पद – वनपाल, वर्ग-३, करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. या शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून जात असल्याने नदीपात्रातील माती शेतात टाकण्याचे काम सुरू होते. आरोपी वनपाल जहीर शेख यांनी तक्रारदारांचे हे काम बंद करून माती भरण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात जहीर शेख याच्या सहकारी भुमरे मॅडम आणि स्वतःसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली होती.
वरील तक्रारीच्या अनुषंगाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. त्यानंतर रविवारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा, आयटीआयसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित वनपालाने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये माळेगाव पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस नाईक प्रवीण तावरे, महिला पोलीस शिपाई वैशाली माकर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.






