कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही- दिलीप वळसे पाटील

कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही- दिलीप वळसे पाटील
Share

मंचर- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. दोन्ही ठिकाणांची भौगोलिक परिस्थिती आणि हद्द वेगळी असल्याने अपुऱ्या माहितीच्या आधारे अभयारण्याचे नाव वृक्षतोडीशी जोडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीच्या घटनेचा संदर्भ देताना भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचे नाव जोडल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. वनक्षेत्राशी संबंधित बातम्या प्रसिद्ध करताना संबंधित ठिकाणाची भौगोलिक माहिती आणि वस्तुस्थिती तपासणे आवश्यक आहे. चुकीच्या संदर्भामुळे भीमाशंकर अभयारण्याची प्रतिमा मलिन होऊ नये, याची माध्यमांनी काळजी घ्यावी, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड सुरू असल्याचे वृत्त वन विभागाने फेटाळले आहे. पुणे वनवृत्ताचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीची घटना आणि भीमाशंकर अभयारण्यातील परिस्थिती यांची गल्लत न करता अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, असे त्यांनी नमूद केले.

Vedh News