तळोजा गोळीबार प्रकरणी तीन जणांना पुण्यातील आंबेगाव दत्तनगर येथून अटक

पुणे- नवी मुंबईतील तळोजा परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार करणाऱ्या ३ आरोपींना पुणे पोलिसांच्या आंबेगाव पथकाने दत्तनगर परिसरातून शिताफीने अटक केली आहे. ही घटना २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील तळोजा येथे घडली होती.
रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), सौरभ गोरख चौधरी (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९, रा. खंडाळे, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की नवी मुंबईतील तळोजा फेज २, शिवाजी चौकाजवळील मारवा बिल्डिंगजवळ दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केले होते.
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपी पुण्यात लपून बसल्याची गुप्त माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने दत्तनगर भागात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. आंबेगाव पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या पथकाने कामगिरी केली.






