बांधकाम चालू असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, तळजाई येथील घटना

बांधकाम चालू असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, तळजाई येथील घटना
Share

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळजाई वसाहतीतील बायोगॅस प्रकल्पाजवळ घडली. या दुर्घटनेत मुलाच्या दोन्ही पायांना गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून, कंबर, पोट आणि हातालाही दुखापत झाली आहे.

निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो आठवीच्या वर्गात शिकतो. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो शाळेतून घरी आला. त्यानंतर काही वेळाने मित्र ओम सचिन कसबे याच्यासोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओमने घरी येऊन निखिल टाकीत पडल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

ही माहिती मिळताच निखिलची आई मंजू साठे, आजी आणि काका घटनास्थळी धावले. तळजाई येथील बायोगॅस प्रकल्पाजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाच्या ठिकाणी निखिल पडलेला दिसला. स्थानिक रहिवासी उद्धव लहु कांबळे यांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२१ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांनी महापालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित टाकीचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणी निखिलची आई मंजू साठे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक जाळी, चेतावणी फलक किंवा अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, असा आरोप निखिलच्या आईने तक्रारीत केला आहे.

सहकारनगर पोलिसांनी एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश मोरे करीत आहेत.

Vedh News