पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची कंत्राटी नगर सचिव म्हणून नियुक्ती

पिंपरी- महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची कंत्राटी नगर सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची निवड वैध असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्याने त्यांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेसह विविध विषय समित्यांच्या सभेचे कामकाज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापौर रवी लांडगे यांनी यांच्या आग्रहस्तव डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विजय जगताप यांची कंत्राटी नगरसचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र जगताप यांच्याकडे आर्थिक अधिकार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी जगताप यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्याबाबत कायदा विभागाकडे कोणतेही उत्तर नसल्याने आयुक्तांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ४८ अन्वये नगरसचिव यांची अधिकार व कर्तव्य निश्चित करण्यात आली आहेत.
कायद्यात नमूद केल्याप्रमाणे फक्त नगरसचिव पदावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्यानेच सभा शाखेचे सर्व कामकाज पार पाडणे अपेक्षित असते. महापालिकेच्या सभा शाखेचे कामकाज सुरळीत, अखंडित, कार्यक्षमपणे पार पाडण्याच्यादृष्टीने महापालिकेने उल्हास जगताप यांची नगर सचिवपदी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सोमवारी (दि. १९) त्यास मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे कंत्राटी नगर सचिवास सभा शाखेचे म्हणजेच महापालिका सभा, स्थायी समिती व विविध विषय समित्यांचे कामकाज करण्याविषयीचा संभ्रम शासनाने दूर केला आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सभा शाखेचे सर्व कामकाज जगताप यांच्यामार्फत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






