मर्सिडीज कारच्या धडकेत डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा मृत्यू; वृद्ध आईला १६. ७२ लाखांची भरपाई देण्याचे न्यायाधिकरणाचे आदेश

पुणे – पुण्यातील येरवडा परिसरात मर्सिडीज-बेंझ कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या वृद्ध आईला कारची मालक असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाहनाचा विमा उतरविणारी द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांनी संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे १६ लाख ७२ हजार २१० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश पुणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत. न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. आर. अगरवाल यांनी हे आदेश दिले आहेत.
१८ जून २०२४ रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ क्लबसमोर हा भीषण अपघात घडला होता. केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. पद्मावती, पुणे) हे या अपघातात मृत्यूमुखी पडले होते. ते एका खासगी कुरिअर कंपनीत डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करत होते.
घटनेच्या दिवशी केदार चव्हाण हे दुचाकीवरून गोल्फ क्लब चौकातून येरवडा कारागृह टपाल कार्यालयाच्या दिशेने जात होते. गोल्फ क्लबसमोर अचानक त्यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीज-बेंझ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार त्यांच्या अंगावरून गेली.
या अपघातात केदार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताप्रकरणी मर्सिडीज कारचालकाविरोधात भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले.
दरम्यान, एकुलता एक आधार गमावलेल्या वृद्ध आईने अॅड. व्ही. एस. नवले यांच्यामार्फत कारमालक आणि विमा कंपनीविरोधात मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात भरपाईसाठी दावा दाखल केला. न्यायाधिकरणाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे तपासले. त्यानंतर कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे निरीक्षण नोंदवले.
न्यायाधिकरणाने अपघातातील मृत व्यक्तीच्या आईला १६ लाख ७२ हजार २१० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम सीरम इन्स्टिट्यूट आणि द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांनी संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.






