मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेप्रकरणी पुण्यातील महाविद्यालय प्रशासनाच्या विरुद्ध दाखल गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई- दहा वर्षांपूर्वी मुरुड समुद्रकिनाऱ्यावर मुरुड बीचवर १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी, पुण्यातील एका महाविद्यालयाचे शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या विरोधात २०१६ मध्ये दाखल झालेली एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. केवळ दुर्घटना घडली किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला म्हणून महाविद्यालयातील संबंधिताना निष्काळजीपणा साठी जबाबदार धरता येणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
१ फेब्रुवारी २०१६ पुण्यातील ‘अबेदा इनामदार सीनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स’चे ११६ विद्यार्थी आणि कर्मचारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर असताना, तिसऱ्या वर्षाचे ४१ विद्यार्थी समुद्रात उतरले, ज्यापैकी १४ विद्यार्थी वाहून गेले आणि बुडाले.
या घटनेच्या सुमारे ८० दिवसांनंतर, कॉलेजचे विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी अशा १७ जणांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षकांकडून घोर किंवा गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध नाही. न्यायालयाने नमूद केले की, पीडित विद्यार्थी हे बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे होते आणि त्यांना जीवनाचा पुरेसा अनुभव होता; त्यामुळे, योग्य-अयोग्य यांमधील फरक ओळखण्याची आणि स्वतःच्या कृती व वर्तनाचे संभाव्य परिणाम समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडून अपेक्षित होती.
विद्यार्थ्यांच्या सोबत असलेल्या शिक्षकांकडून कोणतीही गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा कोणताही पुरावा न्यायालयाला आढळला नाही असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे.






