रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी आज दिवेघाट दोन तास बंद

पुणे – आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दिवेघाटात शुक्रवारी (ता. २३) ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुपारी १२ ते २ या वेळेत दिवेघाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. घाटातील अवघड व खडकाळ भागातील रुंदीकरणासाठी नियंत्रित ब्लास्टिंग केले जाणार आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन दोन तास घाटातील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात येईल.
या दरम्यान प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून सासवड, जेजुरी किंवा पुण्याच्या दिशेने ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.






