पिंपरी- येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉक्टरला जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय तसेच शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी डॉ. ज्ञानेश्वर विश्वनाथ बोराडे (वय ४५ रा.धायरी, पुणे) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता कलम ३५२ तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तक्रारदार डॉ. बोराडे हे वायसीएम रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवेत रुजू होणे, गैरहजेरी, विभागीय चौकशी आणि सेवेतून कमी करण्याच्या कारवाई वरून त्यांचा डॉ. वाबळे यांच्याशी वाद सुरु होता. या संदर्भात डॉ. बोराडे यांनी विविध शासकीय तसेच वैद्यकीय संस्थांकडे तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, डॉ. बोराडे हृदयरोग संबंधी रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने देत असल्यामुळे रुग्ण त्यांच्या उपचार पद्धतीवर समाधानी होते. त्यामुळे रुग्णांचा त्यांच्याकडे ओढा अधिक वाढत होता. वायसीएम रुग्णालयात चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा मिळू लागल्यास इतर खासगी रुग्णालयांचा व्यवसाय बंद पडेल त्यामुळे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील या भीतीने आपल्याविरुद्ध कारवाई केल्याचे डॉ. बोराडे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
१० ऑगस्ट रोजी सजकी साडेअकराच्या सुमारास तक्रारदार अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात आलेले असताना त्यांची भेट डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याबरोबर दुसऱ्या मजल्यावरील लिफ्ट समोर झाली. अनुभव प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता डॉ. वाबळे यांनी जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्याचा आरोप डॉ. बोराडे यांनी केला आहे. त्यावेळी काही रुग्ण आणि इतर व्यक्ती उपस्थित असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम करीत आहेत. एकूणच अधिष्ठाता विरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
