दिघी – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १४ लाखांचे दागिने घरफोडी करून चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावून घरफोडीचा बनाव रचणाऱ्या पत्नीचे बिंग फोडले. घर खरेदीसाठी पती दागिने विकेल म्हणून तिने कांड रचल्याचे कबूल केले.
या कथित घरफोडीचा गुन्हा दिघी पोलिसात दाखल झाला होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान घरात बाहेरील संशयित व्यक्ती आल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी इमारतीमधील इतर रहिवासी आणि घरातील व्यक्तींकडे चौकशी सुरू केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी कौशल्याने चौकशी केली. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने दागिने लपविल्याची कबुली दिली. नवीन घर खरेदी करताना आपले दागिने विकले जातील, या भीतीने तिने घरफोडीचा बनाव रचला होता. तिने घरातील गुप्त ठिकाणी लपविलेले सर्व दागिने पंचांसमक्ष पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.
