ब्रेकिंग न्यूज

पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

Share

पुणे – सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणारा शारीरिक आणि मानसिक जाच, हुंड्याची मागणी याला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

शुभांगी अभिजीत गरड (वय ४०) असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती अभिजीत दिलीप गरड, सासरे दिलीप गरड, सासू अनिता दिलीप गरड, दीर अक्षय दिलीप गरड आणि जाऊ प्रियंका अक्षय गरड या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी कलम ८५ अन्वये गुन्हा नोंदवला असून पती अभिजित गरड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकुटे हे माहेर असलेल्या शुभांगी गरड यांचा विवाह जुलै २०२५ मध्ये अभिजीत गरड यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या लोकांकडून शुभांगी यांना अपमानास्पद वागणूक मिळण्यास सुरुवात झाली. संसारोपयोगी साहित्य, घरातील भांडी आणि अतिरिक्त हुंड्याची वारंवार मागणी करून त्यांचा छळ सुरू झाला. इतकेच नव्हे तर सासरच्या मंडळींकडून त्यांच्या खाण्यापिण्यावर जाचक बंधने घातली जात होती. घरातील अगदी छोट्या-मोठ्या आणि किरकोळ कारणांवरून सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्याकडून त्यांना रोज मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. दुसरीकडे, स्वतःचा पती देखील या त्रासाकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने त्या प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होत्या.

हा छळ असह्य पातळीवर पोहोचला असतानाच १३ सप्टेंबर २६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पती आणि शुभांगी यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. नेहमीप्रमाणे पतीने त्यांच्या त्रासाकडे पाठ फिरवली आणि तो रागाच्या भरात घराबाहेर निघून गेला. सासरच्या लोकांचा दररोजचा जाच आणि पतीची कमालीची उपेक्षा सहन न झाल्यामुळे खचलेल्या शुभांगी गरड यांनी पुणे येथील चंदननगर परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत अखेर आपले आयुष्य संपवले.

या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणातील मुख्य संशयित पती अभिजीत दिलीप गरड याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशी करून संशयित असलेल्या इतर सर्व सासरच्या मंडळींना त्वरित अटक करावी, अशी आक्रमक मागणी माहेरच्या नातेवाईकांनी लावून धरली आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.