ब्रेकिंग न्यूज

आर्थिक परिस्थिती नाही म्हणून आईवडिलांचे धक्कादायक कृत्य, पोटच्या मुलीला भंडारा डोंगरावर एकटे सोडून दिले

Share

तळेगाव दाभाडे- देहूजवळील भंडारा डोंगरावर एकटे सोडून दिलेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या आईवडिलांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात येऊन आपली कहाणी सांगितली. ‘कोणी तरी दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला घेऊन तिचा सांभाळ करेल’, या आशेने तिला डोंगरावर सोडल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय शिवशंकर यादव (२३) आणि खुशबू अजय यादव (२२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) अशी या आईवडिलांची नावे आहेत.

भंडारा डोंगरावर एकटी चिमुकली आढळल्याने ६ सप्टेंबर रोजी परिसरात खळबळ उडाली होती. अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला निर्जन ठिकाणी कोणी आणून सोडले, ती हरवली आहे की तिच्यामागे बालअपहरण करणाऱ्या टोळीचा काही संबंध आहे, अशा विविध शक्यता व्यक्त होत होत्या.

पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल केले. चिमुकलीची अवस्था पाहून डॉक्टर आणि पोलीसही भावुक झाले. तिच्याबाबत माहिती मिळावी, यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असतानाच मुलीचे आई-वडील सोमवारी सायंकाळी स्वतःहून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले. सुरुवातीला मुलगी मुंबईत सापडल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र चौकशीत त्यांनी अखेर मुलीला भंडारा डोंगरावर सोडल्याची कबुली दिली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने तिला एखादे चांगले कुटुंब मिळेल आणि तिचा व्यवस्थित सांभाळ होईल, या अपेक्षेने तिला डोंगरावर सोडल्याचे पालकांनी सांगितले.

सध्या चिमुकली वायसीएम रुग्णालयात सुरक्षित आहे. तिच्यावर वैद्यकीय तपासणी सुरू असून डीएनए तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार तिची बालगृहात रवानगी करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.