पिंपरी- हल्ली रील बनवण्यासाठी काय काय करतील हे काही सांगता येत नाही… काही दिवसांपूर्वी नवीन मोटारकार घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पुणे बंगळुरू महामार्ग रोखण्याचा प्रकार घडला होता. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. वाहने समांतर चालवणे, वेग कमी जास्त करणे, ट्रॅफिकला अडथळा करणे आणि या प्रकाराचे कॅमेरा आणि ड्रोनद्वारे चित्रीकरण करून समाजमाध्यमांवर टाकणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
रील बनवण्यासाठी आरोपींनी संत तुकाराम चौक ते मिंडेवाडीकडे जाणाऱ्या एमआयडीसीतील रस्त्यावर वाहने समांतर चालविली. अचानकपणे वाहनांचा वेग कमी जास्त केला जात होता. वाहन अचानकपणे थांबवून त्याचे कॅमेरा व ड्रोनद्वारे चित्रफित बनविण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागी वाहने थांबवून पाठीमागून जाणाऱ्या वाहनांचा रस्ता अडविला. त्यामुळे या रस्त्यावर बराचकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर या प्रकाराची रील बनवून ३ सप्टेंबर रोजी सोशलमिडीयावर टाकण्यात आली.
ही रील पोलिसांच्या नजरेस पडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे चित्रफितीमध्ये प्रसारित झालेल्या मोटारींचे क्रमांक मिळविले. त्यानुसार अलिशान चारही मोटारी जप्त केल्या तसेच तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
