पुणे- राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.
नव्या नियमावलीनुसार, मुंबई वगळता इतर क्षेत्रांमधील स्कूल बस आणि व्हॅनच्या वापराची मर्यादा १५ वरून थेट २० वर्षे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, सीट बेल्ट, डिजिटल हजेरी प्रणाली, पॅनिक बटण आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.
नव्या नियमावलीनुसार पालकांना मोबाईल अॅपद्वारे मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज ३० दिवस जतन करणे बंधनकारक असेल. वाहनचालक आणि मदतनिसांसाठी पोलिस पडताळणी,वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शारीरिक तंदुरुस्तीची अटही लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.
नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार असून शालेय वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
