ब्रेकिंग न्यूज

तळेगाव स्टेशनवर असहाय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना जन्मठेप

Share

पुणे – कौटुंबिक वादाला कंटाळून घरातून पळून आलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शरद मुरलीधर साळवे (वय ४०, रा. गदाखेडा, छत्रपती संभाजीनगर) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्त उर्फ कांचा (वय ४०, रा. काटे कॉलनी, रावेत) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात १८ वर्षीय पीडितेने पुणे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही घटना २५ ते २६ जानेवारी २०१६ दरम्यान तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील कारशेडमध्ये घडली.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, कौटुंबिक वादाला कंटाळून पीडित मुलगी बारामतीहून मुंबईला गेली होती. परतीच्या प्रवासात ती रात्री चुकून तळेगाव रेल्वे स्थानकावर उतरली. तिचा गैरफायदा घेऊन पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपींनी तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केले होते.

पुण्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम तापकिरे यांनी दोन्ही आरोपीना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आपल्या निकालपत्रात न्यायालयाने म्हटले आहे की हतबल पीडितेच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन गंभीर आणि घृणास्पद गुन्हा करणारे गुन्हेगार कोणत्याही दयेला पात्र नाहीत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक असल्यामुळे त्यांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे.