पुणे- बेडरूम मधील कपाटाचे डिजिटल लॉकर तोडून अज्ञात चोरटयांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी डॉ. अशोक भालचंद्र भणगे (वय ७३) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. भणगे हे मॉडेल कॉलनीतील लकाकी रस्त्यावरील प्रराम सोसायटीत राहतात. ते रूबी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट आहेत. घराला कुलूप लावून ते आणि त्यांची पत्नी मुंबईला गेले होते.
शनिवारी (दि. २५) मध्यरात्री चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटाच्या लॉकरचे डिजिटल लॉक तोडून चोरटयांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचे हिरे व सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान त्यांच्या घरी सीसीटीव्ही आहेत. त्यांनी २६ जुलै रोजी पहाटे सुमारे ५.५५ वाजता मोबाईलवरून सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. त्यात त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.
डॉ. भणगे मुंबईहून पुण्यात परतल्यानंतर पाहणी केली असता घरातील मौल्यवान दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात ४० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या साखळ्या, हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्याचे कानातले, मोत्यांचा नेकलेस व कानातले, चार डायमंड अंगठ्या आणि दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश असून, या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसी टीव्ही फुटेज तपासून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
